छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एकजूट पाहायला मिळाली. कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर शहरात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
कन्नड येथे पालक पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आ. सतीश चव्हाण यांचा पदवीधर मतदारसंघ ७६ तालुक्याचा विस्तृत मतदार संघ आहे. मंत्री अतुल सावे म्हणाले की, महायुतीची एकजूट आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली असल्याने त्यांचा विक्रमी विजय निश्चित आहे. सिल्लोड येथे झालेल्या सभेप्रसंगी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आ. सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पदवीधर मतदारांशी संपर्क करून त्यांचे मतदान करून घ्यावे असे आवाहन केले.
संत एकनाथ रंगमंदिर येथे भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रमुख तथा माजी आ. संजय केनेकर, नोंदणी सहप्रमुख एम.के.देशमुख यांनी पदवीधर मेळावा आयोजित केला होता. विविध ठिकाणच्या सभांना डॉ.भागवत कराड, आ. सुहास शिरसाट, आ. अनुराधा चव्हाण, महापौर समीर राजुरकर, किशोर शितोळे, अभिजीत देशमुख, माजी आ. नितीन पाटील, माजी आ. सांडू पा. लोखंडे, संजय खंबायते, स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, सुरेश बनकर, मनोज राठोड, इंद्रिस मुलतानी आदी उपस्थित होते.















